एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. असे असताना देखील या दहा दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 3650 ने वाढली आहे.
एकीकडे गर्दी करू नका असे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत यंदा पहिल्यांदाच कोरोना मुळे गणरायाचे आगमन अगदी साध्या पध्दतीने करण्याची वेळ आली. त्याचपध्दतीने बाप्पाला निरोप देखील देण्यात आला. यंदा ढोल, ताशांचा आवाज देखील फारसा कानावर पडला नाही. इतकेच नव्हे तर मिरवणूक देखील रद्द करण्यात आल्या होत्या. असे असताना देखील या काळात 3650 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
गणेशोत्सवपूर्वी जिल्ह्यात होते 20044 रुग्ण
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी 21 तारखेपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा 20044 वर होता. त्यात दहा दिवसांत गणेशोत्सव काळातील कोरोनाबाधितांची संख्या पाहिली तर त्यात 3650 ने वाढली व 1 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही 23694 वर जाऊन पोहचली आहे.
दहा दिवसांत 3444 रुग्ण बरे होऊन घरी
कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबर बरे होऊन जाण्याची संख्या देखील वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव काळातील दहा दिवसांतील कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याची संख्या पाहिली तर 3444 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.